वणी : नागपूर येथील मध्यवर्ती बस स्थानक डेपोत बुधवारी दुपारी एका बसमध्ये बॉम्बसदृश्य बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली. बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणीत बॉक्समध्ये बॉम्ब असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. हा संशयित बॉक्स सुराबर्डी परिसरात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली येथून MH40 Y5097 क्रमांकाची बस 1 फेब्रुवारी रोजी नागपुरात आली. त्यानंतर बस मंगळवारी सावनेरची फेरी करुन परत आली. मेंटेनन्ससाठी बस डेपोत आल्यानंतर मेकॅनिकला बसच्या केबिनमध्ये संशयास्पद बॉक्स दिसला. त्यानंतर याबाबत गणेशपेठ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली.
माहितीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक गणेशपेठ एस. टी. डेपोत दाखल झाले. पोलिसांनी बॉम्बशोधक आणि नाशक (BDDS) पथकाला पाचारण केले. पथकाने बसमधील बॉक्सची तपासणी केली असता त्यात बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे काही ज्वलनशील घटक आढळून आले आहेत. त्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांच्या सुरक्षेत संबंधित बॉक्स सुराबर्डी जंगलात तपासणीसाठी नेण्यात आला.
दरम्यान एक तास चाललेल्या कारवाईत बसमधील बॉक्समध्ये असलेली बॉम्बसदृश वस्तू बीडीडीएस पथकाने हस्तगत केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. बस मध्ये बॉक्स कुठून आला आणि यामागे कोणाचा हात आहे याबाबत नागपूर पोलीस सखोल चौकशी करत आहे.