वणी : कत्तलिसाठी अवैधरीत्या जनावरांची तस्करी करणाऱ्या एका सहा चाकी आयशर वाहनाला बजरंग दल कार्यकर्त्यांनी सोमवारी मध्यरात्री रेल्वे क्रॉसिंग जवळ अडविले. माहितीवरून घटनास्थळी पोहचलेल्या वणी पोलिसांनी वाहनासह 17 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करून निजामाबाद येथील तिघांना अटक केली. आरिफ अल्लाबक्ष कुरैशी (53), शेख समीर शेख नन्हु (20) रा. उदुर, जि. निझामाबाद तसेच आयशर चालक शेख बबलू शेख फकीर (28), रा. धरमपुर, जि. निझामाबाद असे जनावर तस्काराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार स्थानिक बजरंग दल कार्यकर्त्यांना खरबडा परिसरातून जनावर तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीवरून सोमवारी मध्यरात्री दरम्यान बजरंग दल कार्यकर्त्यांनी सापळा रचून वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग जवळ AP24 TB4799 क्रमांकाच्या आयशर वाहनाला अडविले. रेल्वे क्रॉसिंग जवळ काही लोकांनी जनावर भरलेला वाहन अडवून ठेवल्याची सूचनेवरून वणी पोलीस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता आयशर वाहनात 8 ते 10 वर्ष वयाची 12 म्हशी, 13 नग हेले तसेच 3 ते 4 वर्ष वयाचे 24 नग म्हशीचे बछडे असे एकूण 49 जनावर निर्दयीपणे कोंबून आढळले. आयशर गाडीमध्ये चालकासह बसलेल्या इतर दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर जनावर तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली आहे. तसेच येथील खरबडा भागातून जनावर भरल्याची माहिती दिली.
पोलिसांनी आयशर वाहनातून 49 जनावरांची सुटका करून त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी उज्ज्वल गौरक्षण संस्थेमध्ये पाठविले. अटकेतील तिन्ही आरोपी विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा 1960 चे कलम 11 (1), 11 (1)(d), 11 (1)(e), 11 (1)(i), 11 (1)(j) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
खरबडा परिसर बनला जनावर तस्करीचा ‘हॉट स्पॉट’
येथील रंगनाथ स्वामी मंदिराला लागून असलेला खरबडा मोहल्ला हा गोवंश जनावरांची अवैध कत्तल व तस्करीचा मुख्य केंद्र बनला आहे. वणी पोलिसांनी अनेकदा या भागात छापा मारून गोवंश मांस जप्त केला. खरबडा परिसरात अनेक व्यक्ती जनावर तस्करीच्या व्यवसायात उतरले आहे. येथून कायर, मुकुटबन, कोरपना मार्गे तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे गाई, बैल, कालवट, म्हशी, वगार जनावरांची दररोज तस्करी होत आहे.