जितेंद्र कोठारी, वणी : खासगी रुग्णालयात एसी (वातानुकूलित यंत्र) बसविण्याची बतावणी करून एका ठकबाजाने दुकानदाराची 3 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केली. ही बाब शनिवारी दुपारी शहरात उघडकीस आली. याप्रकरणी कार्तिक नारायण देवडे (32), रा. राम शेवाळकर कॉम्प्लेक्स यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. विकी श्रावणकर, रा. मारेगाव, असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी कार्तिक देवडे यांचे राम शेवाळकर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू व ए.सी. विक्रीचे शोरुम आहे. रविवार 7 जानेवारी रोजी दुपारी एक तरुण दुकानात आला. त्यांनी आपले नाव विक्की श्रावणकर, रा. मारेगाव सांगून दवाखान्यात 5 ए.सी. बसविण्याचा भूलथापा देऊन गोदामातील 3 लाख 11 हजार रुपये किमतीचे 5 एसी काढून त्याच्या वाहनात टाकून नेले.
ही घटना 7 जानेवारी रोजी घडली होती. मात्र 20 जानेवारी पर्यंत पैसे न मिळाल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीला फोन करून पैसेची मागणी केली असता त्यांनी कोणत्याही व्यक्तीला ए.सी. घेण्यासाठी पाठविले नसल्याची माहिती दिली. हे ऐकताच कार्तिक देवडे यांना त्याची फसवणूक झाल्याचे समजले. कार्तिक देवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.