वणी : प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विदर्भ साहित्य संघ शाखा वणीतर्फे येथील नगर वाचनालय प्रांगणात हेमंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या व्याख्यानमालेत यावर्षी प्रथम पुष्प यवतमाळ येथील सुप्रसिद्ध वक्ते तथा संस्कृत भारतीचे जिल्हा संयोजक मोरेश्वर गजानन पुंड शास्त्री हे गुंफणार आहेत.
शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता नगर वाचनालयाच्या प्रांगणात “त्यागमूर्ती भगवान श्रीराम” या विषयावर पुंड शास्त्री व्याख्यान करणार आहेत. या शुभप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे आणि श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रवींद्र बेलूरकर हे उपस्थित असतील. वणीकर जनतेने या सुश्राव्य व्याख्यानाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार सचिव गजानन कासावार आणि सर्व संचालक मंडळातर्फे करण्यात येत आहे.