वणी : अवैधरित्या विनापरवाना रेती वाहतूक करताना ट्रक मारेगाव येथील महसूल विभागाच्या पथकाने पकडला. मात्र ट्रक चालक जागेवर रेती खाली करून ट्रक घेऊन पसार झाला. मारेगाव येथील रामनगर वार्डमध्ये ही घटना मंगळवार 26 डिसे. रोजी पहाटे 5 वाजता दरम्यान घडली. जळका येथील तलाठी प्रफुल लक्ष्मण सोयाम यांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी ट्रकचालक विरुद्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी मारेगाव तहसीलदार यांचे आदेशान्वये महसूल विभागाचे पथक नाईट पेट्रोलिंग करीत होते. पहाटे 5 वाजताचे सुमारास पथकाने मारेगाव येथील रामनगर वार्डात एका ट्रकची तपासणी केली असता त्यात रेती भरून दिसली. रेतीची रायल्टी व् परवाना बाबत ट्रक चालक अंबादास कोमटी याला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. ट्रकमध्ये भरलेली रेती अवैधरीत्या चोरट्या मार्गाने वाहतूक केल्याच्या संशयावरून तलाठी प्रफुल लक्ष्मण सोयाम, व्ही.जि. मडावी व जे. एस. कन्नाके यांनी ट्रकचालकास ट्रक मारेगाव तहसील कार्यालयात घेऊन येण्याचे आदेश दिले.
परंतु ट्रक चालक अंबादास कोमटी यांनी महसूल अधिकाऱ्याच्या आदेशाला न जुमानता जागेवर रेती खाली करून पथकातील अधिकाऱ्यासमोर ट्रक पळवून नेला. रेती तस्करी व पळवून नेलेल्या ट्रक बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन तहसीलदार मारेगाव यांचे आदेशानुसार तलाठी प्रफुल सोयाम यांनी 28 डिसे. रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी ट्रक चालक अंबादास गंगाराम कोमटी (50) रा. घोटी, ता. कळंब विरुद्द कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे