सुशील ओझा, झरी : तेलंगणा राज्य हद्दीत पैनगंगा नदी पात्रातून रेती भरुन चोरट्या मार्गाने यवतमाळ येथे जाणाऱ्या ट्रकला पाटण पोलीस व झरी जामणी महसूल पथकाने संयुक्त कारवाई करून पकडला. सदर कार्यवाही 17 डिसें. रोजी रात्री 11 वाजता पाटण बोरी मार्गावर दिग्रस रेलवे गेट जवळ करण्यात आली.
रेती चोरी व वाहतूक शोधकामी पाटण पोलीस व तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथक हे संयुक्तरीत्या गस्तीवर असताना दिग्रस रेल्वे गेट जवळ एक ट्रक पथकाने अडविला. ट्रकची ताडपत्री हटवून तपासणी केली असता त्यात रेती भरुन दिसली. पथकाने ट्रक चालकास रेती वाहतूक पास व रॉयल्टीची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाही.
ट्रकमध्ये भरलेली रेती तेलंगणा राज्यातील अनंतपुर येथून भरुन दिग्रस, बोरी, पांढरकवडा मार्गे यवतमाळ येथे नेत असल्याची माहिती ट्रक चालक मोहीद खान रहमान खान, रा. यवतमाळ यानी दिली. ट्रक चालकाच्या कबुलीवरू रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक क्र. MH 27 X 2087 व त्यात भरलेली 9 ब्रास रेती जप्त करुन ट्रक पाटण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व झरीजामनी तहसीलदार महेश रामगुंडे यांच्या पथकातील मंडळ अधिकारी एन.एम. चवरे, तलाठी संदिप सोयाम, गणेश गुसिंगे, महादेव शिंदे व पोलीस अमलदार हेमंत कामतवार, प्रशांत तलांडे यांनी पार पाडली.