सुशील ओझा, मुकुटबन : गोवंश पशुधन चोरी करुन कतलीसाठी तेलंगणात तस्करी करणाऱ्या तिघांना मुकुटबन पोलिसांनी अटक केली आहे. चोरी गेलेल्या जनावरांच्या मालकांनीच संशयित चोरट्यांना पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. खय्याम गफार सैयद, भास्कर मधुकर बट्टावार रा. मुकुटबन व राजू लिंबाजी सोयाम रा. पिंप्रडवाडी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मुकुटबन येथील लक्ष्मण पारशिवे, मधुकर कल्लुरवार, अशोक पारशिवे, संतोष मंदुलवाऱ, रवींद्र मंदुलवार, विक्रम येनगंटीवार, अमोल येमजलवार, नारायण कल्लूरवार, सुभाष कापनवार यांच्या मालकीचे गाई, गोऱ्हा, कालवड असे 15 जनावरे अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. जनावर मालकांना मुकुटबन येथीलच सराईत जनावर चोरटा खय्याम गफार सैयद याच्यावर संशय असल्याने ते सर्वजण त्याच्या शोधात होते.
दरम्यान मंगळवार 19 डिसें. रोजी मुकुटबन येथीलच एका बिअर बारमध्ये मद्य प्राशन करीत असताना खय्याम सैयद व त्याच्या दोन साथीदारांना पकडुन जनावर मालकांनी पोलिसांच्या हवाली केले. फिर्यादी लक्ष्मण पारशिवे यांनी चोरट्यांनी 55 हजार किमतीचे 15 जनावरे आरोपीने चोरून नेल्याची लेखी तक्रार मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपीविरुद्ध कलम 379,34 भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनात प्रकाश गोरलेवार, बादल जाधव करीत आहे