वणी : कॅन्टीनमध्ये जेवण करीत असताना प्लेटमध्ये फिश घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यात एकाने फिश तळण्याचा झारा दुसऱ्याच्या डोक्यावर मारल्याने त्याचा डोकं फुटले. सदर घटना वेकोलीच्या राजूर येथील टेम्पो क्लबमध्ये 30 नोव्हे. रोजी सायंकाळी घडली. फिर्यादी मनोज अनिल विधाते (29) रा. शेवाळकर परिसर वणी यांनी वणी पो.स्टे. मध्ये दिलेल्या तक्रारीवरून श्रीकांत मिलमिले व महेश जुनघरी या दोघांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी हा वेकोलिच्या भांदेवाडा कोल माईन्समध्ये नोकरीवर आहे. माईन्समध्ये सुरक्षा सप्ताह सुरु असल्याने फिर्यादी राजूर येथे WCLचे टेम्पो क्लबमध्ये जेवण करायला गेला होता. दरम्यान भांदेवाडा माईन्स मध्ये कामावर असलेले गैरअर्जदार श्रीकांत मिलमिले व महेश जूनघरी तिथे जेवायला बसून होते. जेवण करीत असताना प्लेटमध्ये तळलेली मच्छी (fry fish) घेण्यावरून फिर्यादी मनोज आणि श्रीकांत मध्ये वाद झाला.
वाद विकोपाला जाऊन श्रीकांत यांनी मनोजने हातात घेतलेली जेवणाच्या प्लेटला लाथ मारली. तर महेश जुनघरी यांनी मच्छी तळण्याचा लोखंडी झारा हातात घेऊन मनोज विधाते याच्या डोक्यावर मारला. त्यामुळे मनोजचे डोकं फुटले. याच वेळी दोघांनी अश्लील शिवीगाळ करीत मनोज विधाते याला जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी वणी पोलीस ठाण्यात नोंदविले तक्रारीनुसार आरोपी श्रीकांत मिलमिले व महेश जूनघरी यांचेवर कलम 324, 34, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.