सुशील ओझा, मुकुटबन : तालुक्यातील अडेगाव येथील एका इसमाला रस्त्यात अडवून काठीने बेदम मारहाण करण्यात आली. सदर घटना 4 जून रोजी रात्री 1.30 वाजता दरम्यान घडली असून मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी नागेश्वर दत्तू चौधरी (50) रा. अडेगाव यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये गावातीलच तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी बंडू गंगाराम घाटे, विनोद बक्का मासिरकर व समाधान दशरथ हेपट या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. दिनांक 4 जून रोजी कामावरून परत आल्यावर ते वन अधिकारी साळुंखे सोबत जंगलात गेले होते. रात्री 1.30 वाजता दरम्यान वन अधिकाऱ्यांनी फिर्यादी याला अडेगाव येथे सोडले. रस्त्याने पायी घरी जात असताना गैर अर्जदार बंडू घाटे, विनोद मासिरकर व समाधान हेपट यांनी दुचाकीने येऊन नागेश्वर चौधरी याला अडविले व तू नेहमी आमची तक्रार करतो असे म्हणून तिघांनी त्याला काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाणीत नागेश्वर हा बेशुद्ध होऊन खाली पडला, तेव्हा आरोपी दुचाकीवर तिथून पळून गेले. मारहाणीच्या घटनेत फिर्यादीचा एक हात व पाय फ्रॅक्चर झाला असून त्याचा चंद्रपूर येथे उपचार सुरु असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपी बंडू घाटे, विनोद मासीरकर व समाधान हेपट सर्व रा. अडेगाव, ता. झरीजामणी विरुद्ध कलम 326, 323, 504, 506, 34 भादवि अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज पातुरकर करीत आहे.