वणी टाईम्स न्युज : पाहुण्यांना बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सोडून परत येताना कारचा भीषण अपघात झाला. नांदेपेरा मार्गावर नगराळे यांच्या दवाखान्या समोर पहाटे 4 वाजता घडलेल्या या अपघातात समोरील दोन्ही एअर बॅग उघडल्याने कारमधील दाम्पत्य सुदैवाने सुखरूप बचावले.
प्राप्त माहितीनुसार येथील साई मंदिर चौकात मणीप्रभा टॉवर कॉम्पलेक्स मधील रहिवासी आशिष झामड त्यांची वहिनी आणि पुतण्याला रेल्वेत बसविण्यासाठी रात्री 12 वाजता सियाझ कार क्रं.MH29 BC6199 ने बल्लारशाह साठी निघाले होते. यावेळी आशिष सोबत त्याची पत्नी अभिलाषा होती. वहिनीला बल्लारशाह येथे रेल्वेत बसवून झामड दाम्पत्य रात्री 3 वाजता परत निघाले. पहाटे 4 वाजता दरम्यान वणी पर्यंत ते सुखरूप आले, मात्र आपल्या घरापासून अंदाजे 100 मीटर पहिले डॉ. नगराळे यांच्या दवाखान्या समोर कारचालक आशिष झामड याचा कारवरून नियंत्रण सुटला, आणि कार दुसऱ्या साइडला भाजी दुकानाच्या समोर इलेक्ट्रिक खांबावर जाऊन धडकली.
ही धडक इतकी जोरदार होती की सिमेंटचा खांब गाडीचा बोनट चिरून अंदर घुसला. धडक बसताच कार मधील दोन्ही एअर बॅग उघडली. त्यामुळे कार चालक आशिष आणि त्यांची पत्नीला फक्त किरकोळ इजा झाली. घटनेबाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.