जितेंद्र कोठारी, वणी : मुंबईतील घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे विशालकाय लोखंडी होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेनंतर राज्यातील सर्व महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद यांना त्यांच्या क्षेत्रात उभ्या सर्व होर्डींग्सची तपासणी व कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आदेशनाव्ये वणी नगर परिषद ॲक्शन मोड मध्ये आली असून शहरातील सर्व होर्डिंग्ज (जाहिरात फलक) धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
वणी नगरपालिका कडून होर्डींग्ज बाबत केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरात गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकासह ठिकठिकाणी शासकीय व खाजगी इमारतीवर लावण्यात आलेले 19 होर्डिंग्ज हे पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतरीत्या उभारण्यात आले आहे. त्यात 7 होर्डिंग्ज रेल्वेच्या मालकीच्या जागेवर असल्याचा उत्तर होर्डिंग्ज संचालकांनी पालिकेला दिला आहे.
शहरात कुठेही जाहिरात फलक लावण्यासाठी नगरपरिषदेची परवानगी घ्यावी लागते. परंतु नगर पालिकेकडून फक्त 5 होर्डिंगसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. शिवाय छ. शिवाजी महाराज चौक येथे 4, वन विभाग कार्यालय समोर 1, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ 1, नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंग जवळ 6, वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग जवळ 1, खाती चौक 1, विराणी टॉकीज 1, यवतमाळ रोड 1, साई मंदिर चौक 1, बस स्थानक परिसर 1 व घुग्गुस मार्गावर 1 असे एकूण 19 जाहिरात बोर्ड नगर पालिकेच्या परवानगी विना उभारण्यात आल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.
नगरपालिकेने शहरातील सर्व अधिकृत व अनधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची नोटीस संबंधितांना बजावली आहे. आदेशाच्या अनुषंगाने काही होर्डिंग्ज धारकांनी ऑडिट रिपोर्ट सादर केली आहे. तर अनधिकृतरित्या उभारलेले होर्डिंग्ज गॅस कटरच्या सहाय्याने कापून काढण्याची तयारी पालिका प्रशासन करीत असल्याची माहिती कर अधीक्षक तेजस हगोणे यांनी वणी टाईम्सला दिली.
जाहिरात फलक लावण्याचे नियम व शुल्क
शहरात शासकीय किंवा खाजगी जागेवर जाहिरात फलक (होर्डींग्ज) उभारण्यासाठी नगरपालिकेत 5 हजार रुपये शुल्क भरून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं. शिवाय शासकीय जागेवर होर्डिंग्ज लावल्यास 1200 रुपये प्रति महिना जागेचा भाडा नगर पालिकेला द्यावा लागत असे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या शुभेच्छा व कार्यक्रमाच्या जाहिरात बॅनरसाठी 3 रुपये चौरस फूट (कमाल 7 दिवसासाठी) तर व्यावसायिक जाहिरातीवर 10 रू. चौरस फूट कर पालिकेकडून आकारल्या जाते.