जितेंद्र कोठारी, वणी : घोन्सा वणी मार्गावर कोरंबी (मारेगाव) जवळ 16 मे रोजी घडलेल्या रॉबरी प्रकरणाचा मास्टर माईंड ॲपे ऑटोमध्ये बसलेला हेल्परच निघाला आहे. घटनेच्यावेळी वाहन चालक जितेंद्र रिंगोळे सोबत वाहनात हेल्पर म्हणून असलेला लक्ष्मण शंकर मेश्राम यांनीच कट रचून मित्राच्या मदतीने लुटीच्या या घटनेला अंजाम दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीने दिलेल्या टीप वरून 4 जणांनी ऑटो रस्त्यात अडवून चालकाजवळ असलेली 80 हजार रुपयांनी भरलेली बॅग व हेल्पर लक्ष्मणचा मोबाईल हिसकावून पळून गेले होते.
वाहन चालक जितेंद्र तुळशीराम रिंगोळे, रा. मुर्धोनी, ता. वणी यांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून अवघ्या 4 दिवसात मास्टर माईंड लक्ष्मण शंकर मेश्राम (21) रा. मेसा, ता. वरोरा जि. चंद्रपुर ह.मु. पंचशीलनगर वणी, वैभव उर्फ कुणाल अनिल निखाडे (19) रा. दावत हॉटेल जवळ इंदीरा चौक वणी, अभिषेक बळीराम मेश्राम (21) रा. नायगाव ता. वणी, व राहुल सुनिल राजुरकर (24) रा. नायगाव ता. वणी या चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. तर एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी घटनेमध्ये वापरलेली ॲक्टिव्हा मोपेड MH29-AY 2767 जप्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि वणी येथील किराणा माल व्यावसायिक राजेश तारुणा यांचे वाहेगुरू किराणा भांडार नावाने दुकान आहे. ते खेडे गावात किराणा मालाचा पुरवठा करतात. दिनांक 16 मे रोजी त्यांनी आपल्या तीनचाकी मालवाहू अपे वाहनात किराणा माल भरून चालक जितेंद्र रिंगोले सोबत घोंसा, दहेगाव, रासा, झरीजामणी भागात पाठविले होते. ॲपे चालक जितेंद्र रिंगोळे यांनी नेहमीप्रमाणे ऑटोवर हेल्पर म्हणून लक्ष्मण मेश्रामला सोबत घेतला होता.
किराणा मालाचा पुरवठा व जुनी वसुली घेऊन परत येताना कोरंबी (मारेगाव) जवळ जनता शाळा परिसरात सायंकाळी 6.15 वाजता दरम्यान दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ऑटो अडविला व हेल्पर लक्ष्मण मेश्राम याला मारहाण करण्यास सुरुवात केली. वाहनचालक जितेंद्र हा खाली उतरला असता मारहाण करणाऱ्यापैकी एकाने त्याच्या डोक्यावर वजनी वस्तुने प्रहार केला. त्यामुळे चालक जितेंद्र हा खाली कोसळला. तेव्हां हल्लेखोरांनी त्याच्या गळ्यात असलेली बॅग हिसकावून घेतली. तर दोघांनी लक्ष्मणच्या खिश्यात असलेला मोबाईल हिसकावून दुचाकीवर बसून पळून गेले.
रहदारीच्या रस्त्यावर अश्याप्रकारे लुटीच्या घटनेमुळे पोलीसही चक्रावले होते. तपास करताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तसेच वाहन चालक जितेंद्र रिंगोळे व हेल्पर लक्ष्मण मेश्राम यांचे कॉल डिटेलची तपासणी केली. त्यात हेल्पर लक्ष्मण यांनी घटनेच्या दिवशी त्याच्या साथीदारांना वेळोवेळी फोन केल्याचे आढळले. त्यावरून पोलिसांचा लक्ष्मणवर संशय वाढला. पोलिसांनी लक्ष्मण याला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेतली. मात्र पोलिसांनी त्याची कॉल डिटेल व पोलिसाचा प्रसाद देताच आरोपी लक्ष्मण पोपटासारखा बोलता झाला.
आरोपी लक्ष्मण मेश्राम (21) रा. पंचशील नगर वणी हा मागील एका महिन्यापासून राजेश तारुणा यांच्या मालवाहू ऑटोवर हेल्पर म्हणून कामावर होता. ऑटो चालकासोबत खेडोपाड्यात किराणा मालाचा पुरवठा करताना त्या दुकानातून येणाऱ्या वसुली बाबतही एका महिन्यात माहिती मिळविली. वसुलीची रक्कम बघून त्याच्या मनात पाप आला. त्यांनी वसुलीचे पैसे लुटण्याची योजना आखली आणि या योजनेत आपल्या 4 मित्रांना सहभागी करून घेतले.
नियोजित कटाप्रमाणे 16 मे रोजी घोंसा वणी रस्त्यावर कोरम्बी (मारेगाव) जवळ सुनसान जागी दोन दुचाकीवर 4 जण ऑटोला आडवे झाले. हेल्पर स्वतः या कटात सहभागी असल्याचा संशय येऊ नये म्हणून दोघांनी हेल्पर लक्ष्मणला मारहाण केल्याचा बनाव केला व त्यानंतर चालकाकडून पैशाची बॅग व मास्टर माईंड लक्ष्मणचा मोबाईल हिसकावून पळून गेले. मात्र तांत्रिक तपासणीमध्ये त्याचे बिंग फुटले.