जितेंद्र कोठारी, वणी : 28 एप्रिल रोजी झालेल्या चौकीदार हत्या प्रकरणाचा वणी पोलिसांनी छडा लावला असून चौकिदाराचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. घटनेनंतर आरोपीने कुठलाही पुरावा सोडला नव्हता. त्यामुळे पोलिसांना आरोपिबाबत कोणताही क्लू मिळत नव्हता. घटनेच्या तब्बल 18 दिवसानंतर पोलिसांना यश मिळाले आणि आरोपी अजीम शाह रमजान शाह (35) रा. कलंदरी मस्जिद जवळ कारंजा (लाड),मोहम्मद उमर अब्दुल गणी (36) रा. सरकारी दवाखान्याजवळ कारंजा (लाड) व एक विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे.
उल्लेखनीय आहे की, वणी यवतमाळ मार्गावर पळसोनी जवळ योगेश ट्रेडर्स यांचे सिमेंट गोदाम चौकीदाराचा 28 एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याने खून करून लोखंडी सळईचे 4 बंडल चोरले होते. चोरी व खून प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी वणी, मारेगाव, मुकुटबन इत्यादी रस्त्याचे शेकडो सीसीटिव्ही फुटेज तपासले. स्वतः उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे तपासात गुंतले होते.
पोलिसांसाठी आवाहन ठरलेल्या या ब्लाइंड मर्डर केसचा घटनेच्या 18 दिवसानंतर उलगडा झाला. आरोपी अजीम शाह रमजान शाह याचा भंगार व जुने टायर खरेदी विक्रीचा धंदा असून त्याच्यावर कारंजा व नागपूर येथे अनेक गुन्हा दाखल आहे. आरोपी गोदामाबाहेर लोखंडी सळई चोरत असताना चौकीदार जीवन विठ्ठल झाडे याला जाग आली व त्यांनी चोरट्याचा विरोध केला. यामुळे आरोपीने चौकिदाराच्या डोक्यावर व पोटावर लोखंडी रॉडने प्रहार करून जिवानिशी ठार केला.
खून प्रकरणाचा छडा लावण्यात करिता पोलीस अधीक्षक यवतमाळ पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि बलराम झाडोकार, धिरज गुल्हाणे, सुदाम आसोरे, अश्विनी रायबोले, रामेश्वर कांडुरे, पोहेकॉ सुहास मंदावार, विकास धडसे, विजय वानखडे, सुधीर पांडे, योगेश डगवार, पो.ना.पंकज उंबरकर, अमोल अन्नेरवार, अविनाश बानकर, निलेश निमकर, पो. का.शाम राठोड, विशाल गेडाम, मोहम्मद वसीम, रितेश भोयर, अमोल नुन्नेलवार, संतोष कालवेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकर यांनी अहोरात्र मेहनत घेतली.