वणी टाईम्स न्युज: वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी येथील भाजीमंडी परिसरात दिवसाढवळ्या सुरु वरली मटका अड्ड्यावर धाड टाकली. आमदारांनी धाड टाकताच वरली मटका संचालकांनी तिथून पळ काढला. अवैध धंद्या विरुद्ध आमदारांनी केलेल्या या कारवाईमुळे पोलीस विभागाचे लक्तरे वेशीवर टांगले आहे.
मागील काही महिन्यांपासून शहरात अवैध धंद्यांना चालना मिळत असल्याची अनेक तक्रारी आमदार बोदकुरवार यांच्याकडे आली होती. शिवाय शहरात दुचाकी चोरी, घरफोडी, दरोडा व खुनाच्या घटनेचा योग्य तपास होत नसल्याची बाब आमदारांच्या निदर्शनास आली. शहरात मटका, जुगार, झंडीमुंडी, रेती तस्करी व्यवसायांना उत आलेला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर गुरुवारी सायंकाळी 6 वाजता स्वतः आमदाराने सहा.पो. नि. दत्ता पेंडकर यांना सोबत घेऊन भाजी मंडी परिसरात नगर परिषद शाळेच्या भिंतीला लागून सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
अवैध धंद्यांना पोलिसांचा आशीर्वाद
शहरात मागील काही महिन्या पासून चोरी, घरफोडी, दरोडा व खूनासारख्या घटना घडत असताना एकही आरोपी पोलिसांनी पकडले नाही. मटका, जुगार, रेती तस्करी करणाऱ्या कडून हफ्ता वसुली करण्यात पोलीस अधिकारी दंग आहे. ठाणेदाराच्या कार्यप्रणाली बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त यांना तक्रार करण्यात आली आहे.
संजीवरेड्डी बोदकुरवार (आमदार – वणी विधानसभा)
अवैध धंदेविरुद्ध पोलिसांची सतत कार्यवाही
मटका, जुगार, झंडीमुंडी, अवैध दारू विक्री, प्रतिबंधित तंबाखू व गुटखा विक्री विरुध्द पोलीस सतत कार्यवाही करीत आहे. एप्रिल महिन्यात शहरात मटका जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 23 कार्यवाही, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 व 85 अंतर्गत 14 कार्यवाही करण्यात आली आहे. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चौकीदार खून प्रकरणाचा तपास सुरु आहे. शहर पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता व निवडणुकीच्या कामात व्यस्त असतानाही आम्ही आपले कर्तव्य पूर्ण करण्यास तत्पर आहोत.
अनिल बेहराणी (पो.निरीक्षक,पो.स्टे. वणी )