जितेंद्र कोठारी वणी :
कत्तलीसाठी जनावरांची आंतरराज्यीय तस्करी विरुद्ध पांढरकवडा पोलिसांनी मोठी कारवाई करत म्हशीचे 55 हेल्यांची तस्करांकडून सुटका केली. पोलिसांनी तस्करी करणारा कंटेनर जप्त करुन चालकासह दोघांना अटक केली आहे. मुबारिक समसू खान (30) राजस्थान आणि ताहीर रशीद (50) उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या जनावर तस्करांचे नाव आहे.
पांढरकवडाचे उप विभागीय पोलीस अधिकारी यांना जनावरांची तस्करी बाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन SDPO कार्यालयातील पथकाने नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक 44 वर केळापूर जवळ नाकाबंदी केली. गुरुवारी रात्री 1 वाजता दरम्यान नागपूर कडून हैद्राबादकडे जाणाऱ्या RJ40 GA 4266 क्रमांकाच्या कंटेनरला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रक न थांबवता वेगाने पळवून नेला.
पोलीस पथकाने शासकीय वाहनाने कंटेनरचा पाठलाग करून मौजा झुंझारपुर जवळ ट्रक थांबविला. पोलिसांनी पंचासमक्ष कंटेनरचा मागील दार उघडून पाहिले असता त्यात म्हशीचे 55 हेले अत्यंत निर्दयीपणे आखूड दोरीने गळ्याला फास लावून बांधलेले आढळले. त्या जनावरांची चारापाणीची कोणतीही व्यवस्था वाहनात करण्यात आलेली नव्हती. तसेच अनेक जनावरांना जखमा झाल्या होत्या.
पोलीस पथकाने ट्रक चालक मुबारिक समसु खान (30) रा. बेला, पोस्ट -डाबक, जिल्हा – भरतपूर (राज ) आणि जनावर तस्कर ताहीर रशीद (50) रा. केतीपुरा, जिल्हा बागपत (उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर जनावर कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असल्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुली वरुन पोलिसांनी कंटेनर मधील 55 जनावर किंमत 2 लाख 75 हजार तसेच कंटेनर किंमत 15 लाख असे एकूण 17 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
फिर्यादी पोलीस हवालदार रवी सिंहे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपीविरुद्ध कलम 279, 34 भादवि तसेच प्राण्याचा छळ प्रतिबंधक कायदा कलम 11 (1) (D) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या जनावरांची पशू वैद्यकीय अधिकारी घाटंजी कडून वैधकिय तपासणी करून त्यांच्या चाऱ्यापण्याची सोय व संरक्षणासाठी अष्टभुजा गोरक्षण संस्था, चोरंबा रोड, घाटंजी यांचे रीतसर ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोउपनि किशोर गजभिये, स. फौ. प्रमोद घोटेकार, महेश नाईक, धीरज राठोड यांनी केली.