वणी टाईम्स न्युज : परवानगीशिवाय मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात 10 ते 15 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरात सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा कलमाखाली सदर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
उल्लेखनीय आहे की 30 एप्रिल ते 1 मे च्या मध्यरात्री मारेगाव शहरात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. काही शिवप्रेमींनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता रात्रीच मुख्य महामार्गालगत असलेल्या मार्डी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा स्थापन केला होता.
सकाळी हा प्रकार उघडकीस येताच महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुतळा हटविण्याचा प्रयत्न होताच उपस्थित शिवप्रेमींनी विरोध दर्शवित वातावरण तापवले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच वणीसह शिरपूर, मुकुटबन, पांढरकवडा आणि यवतमाळ येथून अतिरिक्त पोलीस फौज व दंगा नियंत्रण पथक मागविण्यात आले.
दरम्यान, काही संतप्त नागरिकांनी महामार्गावर चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत तो प्रयत्न निष्फळ ठरवला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार संजय देरकर यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ससन्मानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथून हलविण्यात आला.
सदर प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने शुक्रवारी रात्री मारेगाव पोलीस ठाण्यात विना परवानगी पुतळा बसविणे, सामाजिक शांतता भंग करणे व रस्ता जाम केल्यावरून तब्बल 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. गुन्हा दाखल झालेल्या नागरिकांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही. सध्या शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.










