वणी : 28 मार्च रोजी येथील शिवतीर्थावर आयोजित शिव जन्मोत्सव कार्यक्रमात आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. शासनातर्फे नेमलेल्या व्हिडिओ सर्वेक्षण पथक (VST) प्रमूख जी.एन.देठे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात सदर कार्यक्रमाचे आयोजकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार 28 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने येथील शिवाजी चौकावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असून शासनाने नेमलेल्या व्हिडिओ सर्वेक्षण पथक द्वारा सदर कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते.
शिव जयंती कार्यक्रमाच्या चित्रीकरण दरम्यान पथक प्रमुखांना शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामागे तयार करण्यात आलेल्या किल्याच्या प्रतिकृतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचे चिन्ह व नाव लिहिलेले झेंडे लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. सदर बाब आदर्श आचार संहितेचा भंग करणारी असल्यामुळे व्हिडिओ शूटिंग टीमचे प्रमुख जी.एन.देठे यांनी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कार्यक्रमाचे आयोजक वैभव सुनील पुराणकर विरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंधक कायदा कलम 3 व भादवि कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.