वणी टाईम्स न्युज : आगामी सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गावरून रूट मार्च काढला. शहर पोलीस स्टेशन पासून निघालेल्या या रूट मार्चचे नेतृत्व उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी केले.
वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकरसह वाहतूक शाखा, शिरपूर, पाटण, मुकुटबन व मारेगाव पोलीस ठाण्यातील 13 पोलीस अधिकारी तसेच 51 पोलीस कर्मचाऱ्यांनी या रूट मार्चमध्ये सहभाग घेतला. शहरातील टिळक चौक, खाती चौक, शहीद चौक, श्याम टॉकीज, गांधी चौक, जत्रा रोड, सरोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक ते परत पोलीस स्टेशन येथे रूट मार्चची सांगता झाली.
यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्सव दरम्यान घ्यावयाची दक्षता बाबत मार्गदर्शन केले. तसेच वणी उप विभाग अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणारे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांचे सत्कार करण्यात आले.