वणी टाईम्स न्युज : वणी येथे उघडकीस आलेले गोवंश हत्या प्रकरणी गोसेवा आयोग समितीची चौकशीनंतर मंगळवारी पोलीस व प्रशासनिक अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे बैठक झाली. जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी गोवंश हत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन 15 दिवसात कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी वणीचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, मुख्याधिकारी सचिन गाडे, पशू संवर्धन उपयुक्त डॉ. रहाटे, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व गोसेवा आयोग समितीचे सदस्य हजर होते.
बैठकीत अपर जिल्हाधिकारी यांनी गोवंश हत्या प्रकरणी पोलीस विभाग व नगर परिषद यांनी केलेल्या कारवाईवर तीव्र नाराजगी व्यक्त केली. नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर अवैध कत्तलखाना तसेच शहरात ठिकठिकाणी उघड्यावर मांस विक्रीची दुकाने असताना पालिका प्रशासनाचे दुर्लक्षवरून मुख्याधिकारी यांना चांगलेच झापले. यावेळी समितीचे सदस्य व विधी सल्लागार ऍड. आतिश कटारिया यांनी ज्या ठिकाणी अवैध गोवंश कत्तलखाना सुरु होता, त्या ठिकाणापासून शंभर मीटर अंतरावर पोलीस चौकी असल्याची बाब अपर जिल्हाधिकारी यांचे निर्दशनास आणून दिली. तसेच इतकी मोठी घटना असताना पोलीस विभागाने अद्याप बीट जमादार व इन्चार्ज यांचेवर कोणतीही कारवाई केली नसल्याची तक्रार अपर जिल्हाधिकारी यांना केली.
बैठकीनंतर यवतमाळ येथील विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना गोसेवा आयोगाचे सचिव सनद कुमार गुप्ता व मनीष वर्मा यांनी सांगितले की, येत्या 15 दिवसात योग्य कार्यवाही न झाल्यास आयोग पुढील चौकशी साठी सक्षम आहे. ज्याठिकाणी अवैध कत्तलखाना सुरु होता, त्या ठिकाणाहून समितीला 125 चे वर गाईचे कानात लावण्यात येणारे टॅग आढळले. त्यावरून येथे गोवंश कत्तलखाना किती वर्षापासून सुरु होता ? याची चौकशीचे आदेशही देण्यात आले.
व्हिडिओ :