जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच गाजली. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असताना काँग्रेसच्या संजय खाडे यांनी बंडखोरी करत ही निवडणूक आणखी रंगतदार केली. भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शिवसेना ठाकरे गटाचे संजय देरकर, मनसेचे राजु उंबरकर आणि अपक्ष संजय खाडे या चार मातब्बरांमध्ये कुस्ती झाल्याने निकाल काय लागणार ? याबाबत अजूनही कोणाला राजकीय अंदाज आलेला नाही. 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीत दुपारी 1 वाजे नंतरच स्पष्ट होणार की वणी विधानसभेत गुलाल कुणाचा उधळणार ..
सलग दोनदा आमदार निवडून आलेले भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हॅट्रिकच्या वाटेवर असताना केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोदकुरवाराच्या वटवृक्षात ताक ओतण्याचा काम पक्षातील काही शिलेदारांनी केले. विधानसभा क्षेत्रात भूतो न भविष्यती असे विकास कामे करूनही सोयाबीन व कापसाला योग्य भाव न मिळाल्याने शासनाविरुद्ध शेतकऱ्याचा रोष त्यांना हॅट्रिकपासून अडवणार की तिसऱ्यांदा त्यांना लाडकी बहिण्या ओवळणार हे 23 तारखेलाच स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी यापूर्वी चार वेळा निवडणूक लढली. मात्र भक्कम मते मिळवूनही त्यांना यश मिळविता आले नाही. यावेळी सत्ता विरोधी लाटेवर स्वार होऊन आमदार होण्याचा त्यांचा स्वप्न साकार होताना दिसत आहे. त्यातले त्यात निवडणुकीत जातीच्या राजकारणाचा शिरकाव त्यांच्या पथ्यावर पडला. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाराजीचा संजय देरकर यांना कितपत फायदा होईल ? हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल. मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते ‘शनिवारी गुलाल आमचाच’ सांगत शहरात फिरत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजु उंबरकर हे विधानसभेतील युवा पिढीचे आयकॉन आहे. आक्रमक भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्याची पद्धत तरुणांना त्यांच्याकडे आकर्षित करत असते. मतदार संघात सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्य संबंधी अनेक उपक्रम राजू उंबरकर राबवितात. यंदाच्या निवडणूक प्रचारात आघाडीवर असलेले राजु उंबरकर यांचा वणी, मारेगाव व झरी तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे. या निवडणुकीत राजू उंबरकर यांचे गुलाल उधळणार की त्यांना आणखी पाच वर्ष वाट पहावं लागणार ? यासाठी वणीकरांना दोन दिवस वाट पहावं लागेल.
कुणबी समाजाचे अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या उमेदवारीमुळे वणीची लढत आणखी चुरशीची झाली. जातीच्या राजकारणात कुणबी समाजाचे गठ्ठा मत मिळविण्याचे संजय देरकर यांचे प्रयत्न होते. मात्र संजय खाडे यांच्या उमेदवारीमुळे कुणबी मत विभागले गेले. बुधवारी झालेल्या निवडणुकीत संजय खाडे यांनी ग्रामीण भागात चांगले मत घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे संजय खाडे बाजी मारणार की संजय देरकरांची बाजी पालटणार. हे 23 तारखेला जनतेला कळणार.
निवडणूक बातमी