वणी टाईम्स न्युज : भारतीय जनता पक्षाकडून संपूर्ण राज्यात सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यासाठी नोंदणी प्रभारी यांची नियुक्त्या करण्यात आली आहे. वणी विधानसभा मतदार संघात भाजप सदस्य नोंदणी अभियानाची धुरा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सह्यानिशी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना संघटनात्मक नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. वणी विधानसभा क्षेत्रातून अधिकाधिक सदस्य नोंदणी करण्याचे आमचे प्रयत्न राहणार असल्याचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाची सदस्यता ग्रहण करण्यासाठी आपल्या मोबाईल वरुन 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन विकसित भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहनही माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले.
भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
सदस्य नोंदणी प्रभारी पदावरून वणी विधानसभा मतदार संघात भाजपची अंतर्गत गटबाजी एकदा पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी सदस्य नोंदणी प्रभारी म्हणून विजय चोरडिया यांच्या नावाची घोषणा केली होती. आणि आता भाजपचे महाराष्ट्र राज्य कार्यालयाने माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वणी विधानसभा सदस्य नोंदणी प्रभारी म्हणून नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यामुळे खरे प्रभारी कोण ? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत पराजयाचा सामना करावा लागला, ही बाब सर्वश्रुत आहे. मात्र आता सदस्य नोंदणी प्रभारी नियुक्ती वरून गटबाजी एकदा पुन्हा चव्हाट्यावर झाली आहे.