जितेंद्र कोठारी, वणी : घरात कुणीही नसल्याची संधि साधून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्याचांदीचे तसेच हिर्याचे दागिने लंपास केले. धाडसी चोरीची ही घटना रविनगर येथे 28 दिसे. ते 2 जानेवारी दरम्यान घडली. फिर्यादी जितेशकुमार श्रीकृष्णमुरारी पांडे, दालमिया नगर, रोहतास, बिहार ह.मू. प्लॉट क्रं. 6 रवीनगर वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवीन वर्ष 2024 च्या सुरवातीतच चोरट्यांनी डाव साधून वणी पोलिसांना आव्हान दिला आहे.
फिर्यादी हा मुकुटबन येथे एम.पी. बिर्ला सीमेंट कंपनीत नोकरीवर असून रवी नगर येथील सूर्यकांत गुलाबराव मोरे यांचे घरी कुटुंबासह भाड्याने राहतात. दिनांक 28 डिसेंबर रोजी फिर्यादी घराला व्यवस्थित कुलूप लावून आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी वृंदावन येथे गेले होते. देवदर्शन करून 2 दिसे. रोजी सायंकाळी 6 वाजता फिर्यादी जितेशकुमार परत आले असता घरातील दोन्ही बेडरूम मधील चार कपाट फोडून त्यातील सर्व समान अस्तव्यस्त पडून दिसले.
कपाटातील समानाची तपासणी केली असता सोन्याचे मंगळसूत्र 10 ग्राम, हीरेजडित हार किमत 50 हजार रु., सोन्याची गळ्यातील साखळी 15 ग्राम, सोन्याचे नाकातील रिंग, कर्णफुल, चांदीची पायातील पट्ट्या आणि 15 हजार रुपये रोख असे एकूण 1 लाख 89 हजार रुपयांचे एवज चोरी गेल्याचे आढळले. चोरीच्या घटनेबाबत फिर्यादी यांनी तत्काल वणी पोलिसांना माहिती दिली. वणी पोलिसांनी यवतमाळ येथून डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 380, 457 नुसार गुन्हा दाखल केला आहे.