जितेंद्र कोठारी, वणी : शहरात चोरट्यांने धुमाकूळ घातला आहे. शहरालगतच्या कॉलोनी मधील मोकळे घर चोरट्यांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. सोमवार 23 डिसेंबर रोजी रात्री घुग्गुस मार्गावरील पद्मावती नगर येथे एका घरातून चोरट्यांनी 1 लाख 92 हजार रोख रक्कम लंपास केली. तर 24 डिसेंबर रोजी रात्री 2.30 वाजता दरम्यान चोरट्यांनी चिखलगाव येथील महादेव नगरीतही चोरीचा प्रयत्न केला. मात्र एका घरात कुत्र्याच्या भुंकल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. घराच्या सीसीटिव्ही मध्ये 3 चोरटे पळून जाताना व्हिडिओ दिसत आहे.
सद्या लग्नसराईचे दिवस असून अनेक जण घराला कुलूप लावून सहकुटुंब लग्नाला जातात. नेमकं याच संधीचा फायदा घेऊन चोरटे घरातील रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारुन देतात. चोरट्यांची मोडस आप्रेंडी पाहून चोरटे हे बाहेर राज्यातील असल्याचा संशय पोलिसांना आहे.
बाहेरगावी जाताना बाळगा खबरदारी
कार्यक्रमानिमित्त सहकुटुंब बाहेरगावी जाताना अनेक नागरिक घराच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. सकाळी परत यायचं आहे म्हणून घरातील दागिने व रोख रक्कम कपाटात किंवा सुटकेस मध्ये ठेवून निश्चिंत होतात. मात्र एका लहानशा चुकीमुळे त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. नेहेमी कामात न येणारे दागिने व मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकर मध्ये ठेवावे. किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे ठेवून बाहेरगावी जावं. शक्यतो जास्त रोख रक्कम घरात ठेवू नये. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना व पोलिसांना सूचित करावं. घराचे बाहेर सीसीटिव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे.