जितेंद्र कोठारी, वणी : मारेगाव येथे मामाकडे राहून आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी दोन महिन्याची गरोदर निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधम युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रणव महादेव राऊत (23) रा. केगाव (मार्डी) असे आरोपी युवकाचे नाव आहे. इयत्ता आठव्या वर्गात शिकणारी शालेय मुलगी गरोदर झाल्याने समाजमन सुन्न झाला आहे.
पिडीत मुलीने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी युवकासोबत मागील एका वर्षापासून तिची ओळख आहे. आरोपी हा पिडीतेच्या आजोबाच्या घराजवळ राहत असून भेटीसाठी आजोबाकडे जाता येताना तिची आरोपीसोबत ओळख झाली. दरम्यान 11 नोव्हे. रोजी आरोपी युवकाने मुलीला एका सुनसान स्थळी बोलावून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. मुलीने प्रतिकार केला असता आरोपीने गावात तिची बदनामी व जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने घडलेल्या घटनेबाबत कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे नराधम युवकाची हिम्मत वाढली आणि त्यांनी वारंवार मुलीवर अत्याचार केला.
मामाचे घरी राहत असताना पोट दुखत असल्याने व मळमळ वाटत असल्याने तिच्या मामाने 31 डिसे. रोजी वणी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवून औषधी दिली. मात्र दोन तीन दिवसांनी परत पोटदुखी झाल्याने वणी येथील एका दवाखान्यात सोनोग्राफी तपासणी केली असता डॉक्टरांनी मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिनं सर्व हकीकत बयान केली. त्यानंतर पिडीत मुलीने मामा आणि आईसोबत मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी प्रणव राउत यांनी इच्छे विरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध करून गर्भवती केल्याची तक्रार दाखल केली.
पिडीताच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रणव महादेव राऊत (23) रा. केगाव (मार्डी) विरुद्ध कलम 376 (1),(A), 376 (2)(J)(N), 50 भादवि सहकलम 3(A), 4,5 (J)(ii), 5 (I), 6 बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.