वणी टाईम्स न्युज : तेलंगणा येथील एका अल्पवयीन मुलीला तिच्या आजीच्या घरुन पळवून नेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तेलंगणा येथील युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. शिवा विश्वनाथ दासरवार (25), रा. पेंडलवाडा, तालुका जैनत, जिल्हा आदिलाबाद, तेलंगणा असे आरोपी युवकाचे नाव आहे.
तक्रारदार यांची 17 वर्षाची मुलगी जैनत येथे शिक्षण घेत असताना पेंडलवाडा येथील शिवा सोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण वडिलांना लागली होती. त्यामुळे 6 महिन्यापूर्वी त्यांनी मुलीला पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत गावात आपल्या आईवडिलांचे घरी पाठविले. 22 मे रोजी सकाळी नात घरात व गावात दिसून न आल्याने आजीने फिर्यादीला फोन करून माहिती दिली.
फिर्यादी वडिलांनी तत्काळ पाटण पोलिस स्टेशन गाठून आरोपी शिवा यांनी त्यांची अल्पवयीन मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन फूस लावून तिचे कायदेशीर पालकांच्या ताब्यातून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 137 (2) BNS नुसार गुन्हा दाखल केला.