वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील कृष्णानपुर येथील शेतकऱ्याचे शेतात बांधलेले 2 बैल शनिवार रात्रीच्या दरम्यान चोरीला गेल्याची तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून भंडारा येथून चोरी गेलेली बैलजोडी आणि चोरीसाठी वापरलेले मालवाहू वाहन जप्त केले. सदर प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. भोलाराम सुरेश पडोळे (33) रा.डोर्ली ता. वणी असे बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी शेतकरी नामदेव दादाजी लांडे, रा. कृष्णानपुर यांनी रविवार 15 सप्टेंबर रोजी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांचे शेतात बांधलेले 2 बैल किंमत 1 लाख 20 हजार हे कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी शनिवार ते रविवार रात्री दरम्यान शेतातून चोरून नेले. फिर्यादवरून उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व शिरपुरचे ठाणेदार एपीआय माधव शिंदे यांनी कृष्णानपुर गावात जाऊन चौकशी केली. रात्रीच्या दरम्यान गावात कुणी बाहेरचे व्यक्ती आले होते का याबाबत गावकऱ्यांना विचारणा केली असता मिळालेल्या माहितीवरुन तांत्रिक तपास करून डोर्ली येथीलआरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला विचारपूस केली असता त्यांनी इतर साथीदाराच्या मदतीने बैलजोडी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच बैलजोडी भंडारा येथे नेल्याची माहिती दिली. माहितीवरुन रातोरात पोलीस पथक भंडारा येथे पाठवून चोरी गेलेली बैलजोडी हस्तगत केली. तसेच चोरीसाठी वापरलेले टाटा एस मालवाहू वाहन क्रमांक MH29 BE 6932 किंमत 3 लाख असे एकूण 4 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सपोनी माधव शिंदे, पीएसआय रावसाहेब बुधवंत, पोलीस हवालदार गंगाधर घोडाम, पोलीस कॉन्स्टेबल गजानन सावसाकडे, चालक विजय फुल्लुके यांनी पार पाडली.