वणी : वरोरा येथे एका लग्नात सहभागी होण्यासाठी आपल्या पतीसह दुचाकीवर जात असलेल्या महिलेचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. वणी वरोरा बायपास मार्गावर वडगाव फाट्याजवळ स्पीड ब्रेकरवर ही भीषण घटना शुक्रवार सकाळी 11 वाजता दरम्यान घडली. अपघातात दुचाकी चालक पतीला किरकोळ मार लागला मात्र महिलेच्या डोक्यावरून ट्रकचा चाक गेल्यामुळे तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. छबूताई उत्तमराव भोंगळे (60) रा. रवी नगर असे मृत महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितनुसार रवीनगर येथील वास्तव्यास असलेले उत्तमराव भोंगळे हे आपल्या मोटारसायकलवर पत्नीला घेऊन वरोरा येथे एका लग्नात जाण्यासाठी निघाले होते. बायपास मार्गाने जात असताना वडगाव फाट्याजवळ डांबरी रस्त्यावर जमा असलेल्या कोळश्याची डस्टवरून त्यांची दुचाकी स्लीप झाली. दुचाकी घसरताच उत्तमराव हे डावीकडे जाऊन पडले तर त्यांची पत्नी छबूताई उजवीकडे रस्त्यावर पडल्या. दुचाकीच्या मागे भरधाव येत असलेल्या एका ट्रकचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने तिच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाली.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मृतक महिलेला दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि आप्त स्वकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.