जितेंद्र कोठारी, वणी : मारेगाव तालुक्यातील जळका येथील आनंद बाल सदन मधील एक अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटनामुळे खळबळ उडाली आहे. श्लोक विनोद कडूकर (14) असा बेपत्ता विद्यार्थ्याचा नाव आहे. याबाबत आनंद बाल सदन व्यवस्थापक दीक्षा मिलिंद नागदेवे हिने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
प्राप्त माहितीनुसार जळका येथील बाल गृहात राहून स्व. लक्ष्मीबाई मोघे विद्यालयात 9 व्या वर्गात शिक्षण घेणारा श्लोक नेहमीप्रमाणे 13 तारखेला बाल गृहातून शाळेत जाण्यासाठी निघाला होता. दुपारी 12.30 वाजता शाळेतील मुख्याध्यापक यांनी बाल गृहात कळविले की श्लोक कडुकर आज शाळेत आला नाही. त्यामुळे बाल गृहातील कर्मचाऱ्यांनी शाळा परिसर, आजू बाजूचे शेत तसेच पांढरदेवी मंदिर परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
त्यानंतर बाल सदन व्यवस्थापक हिने बेपत्ता श्लोकचे मामा अशोक निंबाळकर रा. चिंचमंडळ यांना फोन करून घटनेबाबत कळविले. त्यानी ही गावात शोधाशोध केली. मात्र श्लोक मिळून आला नाही. अखेर आनंद बाल सदन व्यवस्थापकाने मारेगाव पोलीस ठाण्यात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन श्लोक याला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करून शोध घेणे सुरू केले आहे. पुढील तपास ठाणेदार जनार्दन खंडेराव करीत आहे.