वणी टाईम्स न्युज : पोलीस स्टेशन हद्दीत वरोरा मार्गावर नायगाव (खुर्द) येथे मंगळवारी अज्ञात वाहनाने एका अल्पवयीन मुलाला चिरडण्याची घटना घडली होती. सदर घटनेबाबत मृतकाचे नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही घटना अपघात नसून मुलाने आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मयूर बंडू सोनटक्के (15) रा. नायगाव (खुर्द), तालुका वणी असे आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
घटने संदर्भात संदीप पांडुरंग सोनटक्के (41) रा. नायगाव खुर्द यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 1 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता मयूर घरी आला असता त्याच्या वहिनीने तू लवकर घरी का येत नाही, सारखा मोबाईल वर असतो आणि मुलांसोबत जास्त राहू नको असे म्हणून रागावली होती. वहिनी रागावली म्हणून रागाच्या भरात मयूर बस स्टँडकडे निघून गेला. मयूर यांनी वणी वरोरा रोडवर नायगाव फाट्याजवळ ट्रकचे समोर उडी मारून आत्महत्या केली असावी, अशी तक्रार फिर्यादी यांनी दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय अश्विनी रायबोले करीत आहे.