वणी टाईम्स न्युज : यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष वणी येथील संध्याताई बोबडे यांचे पती अरविंद बोबडे (62) यांचे रविवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांना बरं वाटत नव्हता. त्यामुळे चेकअप करण्याकरिता रविवारी सकाळी नागपूर जाण्यासाठी निघाले होते. वरोरा जवळ जात असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने वरोरा येथील एका खाजगी डॉक्टरकडे दाखल केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास त्यांची विवाहित मुलीचा व्हिडिओ कॉल आला होता. मुलीसोबत व्हिडिओ कॉल वर बोलता बोलता त्यांना अचानक हार्टअटॅकचा जोरदार झटका आला आणि त्यांनी प्राण सोडले.
माहितीनुसार अरविंद बोबडे यांना एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा पुणे येथे नोकरीवर आहे. तर लग्नानंतर मुलगी ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाली. नुकतेच बोबडे दांपत्य एक महिना आस्ट्रेलिया मुलीजवळ राहून आठ दिवसांपूर्वीच परत वणी येथे आले होते. अरविंद बोबडे हे 2 वर्षापूर्वीच वेकोलि मधून सेवानिवृत झाले होते. ते एमआयडीसी भागात भूमिपार्क वसाहतीत राहत होते.
वडिलांचे निधन झाल्याची माहिती मिळताच त्यांचा पुत्र पुणे येथून तर पुत्री ऑस्ट्रेलिया येथून वणी येण्यासाठी निघाल्याचे कळते. अरविंद बोबडे यांचे अंत्यसंस्कार त्यांची मुलगी आस्ट्रेलियाहून पोहचल्यानंतर सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. अरविंद बोबडे यांचे निधनाची माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार व काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते त्यांचे भूमिपार्क येथील घरी पोहोचले.