वणी टाईम्स न्युज : वणी तालुक्यातील मोहदा येथील एका क्रशर व हॉटमिक्स प्लांटचा व्यवस्थापक चोरट्या मार्गाने दुसऱ्या व्यक्तीला परस्पर लाखों रुपयांचा डांबर विकताना रंगेहाथ पकडला गेला. शुक्रवार 25 एप्रिल रोजी मध्यरात्री 1.30 वाजता चोरीची ही घटना उघडकीस आली. आरोपी व्यवस्थापकाने उत्तरप्रदेश येथील चोरट्यांसोबत संगनमत करून डांबर विकण्याचा डाव आखला होता. मात्र टँकर मध्ये 8 टन डांबर लोड करीत असताना प्लांट मालकाने त्याला पकडला. सोनूराम श्रीराय भरोसीलाल जाटव (34), रा. महुआखेडा, तालुका खेरगड, जिल्हा आग्रा उत्तर प्रदेश ह. मु. उंबरकर हॉट मिक्स प्लांट मोहदा असे आरोपी व्यवस्थापकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार वणी येथील प्रवीण उंबरकर यांचे मोहदा (वेळाबाई) येथे पी.एम.उंबरकर हॉटमिक्स या नावाने क्रशर व डांबर प्लांट आहे. प्लांटवर ट्रक, मशिनरी, डिझल, मजूर यांचेवर देखरेख, हिशोब व सुरक्षेसाठी सोनूराम जाटव यास सुपरवायझर म्हणून कामावर ठेवण्यात आले होते. मागील काही दिवसापासून सोनूराम याची वागणूक संशयास्पद वाटल्याने प्लांट मालकाने त्याच्या हालचालींवर नजर ठेवली होती.
शुक्रवार 25 एप्रिल रोजी रात्री 1.30 वाजता प्लांट मालक यांचा मुलगा रोहन उंबरकर हा आपल्या एका मित्रासह अचानक प्लांटवर पोहचला. त्यावेळी त्याला प्लांटच्या डांबर टाकीजवळ डांबर वाहतूक करणारा टँकर (बोझर) उभा दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता प्लांटच्या डांबर टाकी मधून रिव्हर्स मोटर चालवून बोझरमध्ये डांबर भरण्याचे काम सुरु होते. त्यावेळी प्लांट व्यवस्थापक सोनूराम जाटव व टँकर चालक त्या ठिकाणी उपस्थित होते. चोरी करताना रंगेहात पकडल्यामुळे दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळ काढला. मात्र पळून जात असताना सोनुराम याचा पाय घसरुन तो खाली पडला आणि रोहन उंबरकर व त्याच्या मित्राने त्याला पकडला. तर टँकर चालक टँकर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.
शनिवारी सकाळी आरोपी व्यवस्थापकाला शिरपूर पोलिसांच्या ताब्यात देऊन फिर्यादी रोहन प्रवीण उंबरकर यांनी 8 टन डांबर किंमत 4 लाख रुपये चोरल्याची रीतसर तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 306, 303 (2), 62, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. पोलिसांनी डांबर चोरीसाठी वापरण्यात आलेला अग्रवाल रोडलाईन्स लिहिलेला डांबर टँकर क्रमांक MH04 JK2045 जप्त केला आहे.
डांबर प्लांटमध्ये मध्यरात्री घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर डांबर चोरीच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा शोध घेतला जात आहे. ज्याच्या खांद्यावर प्लांटची देखरेख व सुरक्षाची जवाबदारी सोपविण्यात आली, त्यांनीच चोरीचा घाट घातल्याने एकच खळबळ उडाली आहे.