वणी : मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील प्रसिद्ध गोटमार यात्रा बघण्याकरीता गावातील महिलांसोबत गेलेल्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मारेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी राळेगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असून गावातीलच एका तरुणानी मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली आहे.
फिर्यादी वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची अल्पवयीन मुलगी तिच्या मोठी आई व गावातील महिलांसोबत 26 मार्च रोजी बोरी (गदाजी) येथे गोटमार यात्रा बघण्याकरिता गेली होती. मुलीची मोठी आई व इतर महिला यात्रा पाहून परत गावात आल्या, परंतु मुलगी परत आली नाही. त्यामुळे वडिलांनी बोरी येथे जाऊन शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही.
फिर्यादी वडिलांनी फोन करून नातेवाईकांकडे विचारपूस केली असता त्याच्या भाच्याने सांगितले की सोनाली (बदललेले नाव) हिला संकेत खडसे (20) यांनी यात्रेमधून नेले आहे. त्यामुळे फिर्यादी वडिलांनी संकेत खडसे यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात त्यांची अल्पवयीन मुलीला अज्ञानतेचा फायदा घेऊन पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. तक्रारीवरुन मारेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे.