वणी टाईम्स न्युज : वणी शहरातील सदाशिव नगर येथे भटक्या कुत्र्यानी एका लहान मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला असून मुलगा जसं तसं कुत्र्याच्या तावडीतून सुटून पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. तर त्याच वेळी गल्लीत सायकल चालवत असलेला दुसरा मुलगा कुत्र्यानी हल्ला करताच सायकल सोडून पळून जाताना दिसत आहे. ही सर्व घटना अनिल उत्तरवार यांच्या घरातील सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे.
मंगळवार 11 मार्च रोजी सायंकाळी 5.40 वाजता सदाशिव नगर येथे अनिल उत्तरवार यांचे घरासमोर अंदाजे 5 ते 6 वर्षाचा एक मुलगा रस्त्यावर सायकल चालवत होता. त्याच वेळी गल्लीत फिरणाऱ्या एका मोकाट कुत्र्यानी त्याच्यावर हल्ला केला. मुलाने आरडाओरड करून स्वतःला कुत्र्याच्या तावडीतून मुक्त करून जीव वाचवून पळून जाताना व्हिडिओत दिसत आहे. त्याचवेळी आवाज ऐकून काही महिलाही घराच्या बाहेर निघाल्या. या घटनेमुळे रस्त्यावर खेळणारे व सायकल शिकणारे लहान मुलांच्या पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
शहरात डुक्करांचा त्रास कमी झाला, मात्र भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली आहे. रस्त्यावर जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनाच्या मागे कुत्रे धावत असल्यामुळे अनेक अपघात घडले आहे. आता तर चक्क लहान मुलांवर हल्ला केल्याची घटना समोर आल्यामुळे प्रचंड दहशत पसरली आहे. नगर पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.
पहा- अंगावर काटा आणणारा सीसीटिव्ही व्हिडिओ