वणी टाईम्स न्युज : शिक्षण घेण्याच्या वयात आई वडिलांनी पोटच्या मुलीचे बळजबरीने 10 वर्ष मोठ्या मुलासोबत लग्न लावून दिले. 13 वर्षाच्या वयात तिला सांसारिक जीवनाबाबत काही कळेना. अशातच तिच्या पतीने तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गरोदर राहिली. 22 फेब्रुवारी 2024 रोजी तिनं ग्रामीण रुग्णालय वणी येथे एक गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांना बाळंतीणच्या वयाबाबत शंका निर्माण झाल्याने त्यांनी विचारपूस केली. तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला.
प्राप्त माहितीनुसार पीडित मुलगी ही आई वडिलांसोबत राजूर कॉलरी येथे राहून मजुरी करत होती. दरम्यान ती 13 वर्ष काही महिन्याची झाली असता तिच्या आई वडिलांनी 23 जून 2023 रोजी मुकेश भुवरा निषाद (25) रा. राजूर कॉलरी सोबत बळजबरीने तिचा विवाह लावून दिला. पत्नी अल्पवयीन असल्याची माहिती असूनसुद्धा तिच्या सोबत बळजबरीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली.
ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर दवाखान्यातून मिळालेल्या मेमो आणि पीडित मुलीच्या फिर्याद वरून वणी पोलिसांनी आरोपी आईवडीलसह पति मुकेश भुवरा निषाद (25) विरुद्ध कलम 376 (2)(N), भादवी तसेच कलम 4,6, (पॉक्सो) सहकलम 9,11 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी पती मुकेश भुवरा निषाद याला अटक करुन सेशन न्यायालय पांढरकवडा येथे हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. पुढील तपास एपीआय निलेश अपसुंदे करीत आहे.