वणी टाईम्स न्युज : मागील काही महिन्यांपासून वणी पोलीस ठाण्याला जस काही ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांवर कारवाई करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतः कारवाईच्या फांद्यात अडकत चालले आहेत. बदली व निलंबनाच्या कारवायांमुळे वणी पोलीस स्टेशन जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. ठाणेदार अनिल बेहरानी यांची वेळेच्या आधी बदली आणि हेड कॉन्स्टेबल गजानन डोंगरे यांचे निलंबन पाठोपाठ आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.
शिवसेना (शिंदे) गटाचे वणी शहर प्रमुख ललित लांजेवार यांची अकस्मात मृत्यू प्रकरणी गुन्हा शोध पथक प्रमुख विकास धडसे यांच्यावर कारवाईची मागणी मृतक ललीतची पत्नीसह सामाजिक संघटना यांनी केली आहे. तर आठवडी बाजारात कोंबडा विकत घेणाऱ्या शेतकऱ्याला पी एस आय धीरज गुल्हाने यांनी विनाकारण मारहाण केल्याचा प्रकरण पोलीस अधीक्षक यांच्या दरबारात पोहचला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमाईदार पोलीस स्टेशन म्हणून वणीचे नाव आहे. राज्य पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी साम दामचा वापर करून वणी येथे बदलीसाठी उत्सुक असतात. वणीत बदली झाली की, लागत पूंजी आणि त्यावर नफा कमविण्याच्या हेतूने अवैध व्यवसायांना खतपाणी घालण्याचे काम काही जण करतात. अशातच ऑक्टोबर 2024 मध्ये वणी पोलीस ठाण्यातील 2 पोलीस शिपाई व 1 महिला सहा. फौजदार यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
राज्यात गोवंश तस्करी व हत्येवर प्रतिबंध असताना वणी पोलिसांच्या नाकाखाली शेकडो गोवंश जनावरांचे कत्तल झाल्याची घटना 11 जानेवारी 2024 रोजी उघडकीस आली. गोवंश हत्येच्या आरोपींना पोलिसांचे सहकार्य व तपासात हलगर्जीपणा केल्याचे गोसेवा आयोगाच्या अहवालावरून 31 जानेवारी रोजी ठाणेदार अनिल बेहरानी यांची उचलबांगडी करण्यात आली. तर कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत खाकी वर्दी ओली करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल गजानन डोंगरे यांना 4 जानेवारी रोजी सस्पेंड करण्यात आले.