वणी टाईम्स न्युज : निवडणूकीपूर्व मंजूर व भूमिपूजन केलेल्या रस्त्याच्या कामाचे परत भूमिपूजन करून फुकटचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न आमदार संजय देरकर करीत आहे. असा आरोप माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. मारेगाव तालुक्यातील आकापूर येथे 10 लाख रुपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन 3 डिसेंबर 2025 रोजी आमदार संजय देरकर यांनी केला होता. त्यावर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आक्षेप घेतला आहे.
तत्कालीन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केलेल्या मागणीनुसार सन 2024 -25 या आर्थिक वर्षातील तरतुदीनुसार विशेष निधी 25/15 अंतर्गत 25 जुलै 2024 रोजी वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील 12 कामासाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यातील अनेक कामाचे वर्क ऑर्डर झाले असून निवडणूकपूर्व भूमिपूजन करण्यात आले. परंतु विद्यमान आमदार संजय देरकर हे सदर कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे.
सदर कामावर निधी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत प्रत्यक्ष खान बाधित क्षेत्रात भौतिक पायाभूत सुविधा शीर्षकाखाली मंजूर झाला होता. त्यामुळे या भूमीपूजनाच्या फलकावर पंतप्रधानांचा फोटो लावणे आवश्यक असतांना भूमिपूजन फलकावर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो छापण्यात आले. त्यामुळे शासकीय प्रोटोकॉलचा सुद्धा भंग झाल्याचा आरोप संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे.
राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना विकास कामासाठी अद्याप निधी मंजूर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आमदार संजय देरकर हे आयत्या बिलावर नागोबा सारखे जुन्या विकास कामाचे परत भूमिपूजन करून फुकटचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
संजीवरेड्डी बोदकुरवार – माजी आमदार वणी विधानसभा
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केलेल्या आरोपाबाबत प्रतिक्रिया जाणण्यासाठी वणी टाईम्स संपादकाने आमदार संजय देरकर यांच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही