जितेंद्र कोठारी, वणी : येथील जिल्हा परिषद कॉलोनीमध्ये एका घरातून अज्ञात चोरट्यानी लाखोंचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. शुक्रवारी रात्री 2 ते 4 दरम्यान घरातील मागील बाजूस असलेला दार तोडून चोरट्याने घरात प्रवेश केल्याचे सकाळी निदर्शनास आले. चोरट्यांनी घर मालक गोपाळ बाळकृष्ण भुसारी यांच्या वृध्द आईचे सुटकेसमध्ये ठेवलेले तब्बल 9 तोळा सोन्याचे दागिने व 45 हजार रुपये चोरले. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी केल्या नंतर घरातील स्वयंपाकघरात गॅसवर चहा बनवून पेल्याचे निदर्शनास आले.
प्राप्त माहितीनुसार वेकोली मध्ये ड्युटीवर असलेले गोपाळ बाळकृष्ण भुसारी यांचे नांदेपेरा मार्गावर जि. प. कॉलोनी मध्ये डॉ. खापणे यांचे दवाखान्यासमोर घर आहे. भुसारी हे सुंदरनगर येथे राहतात तर या घरात त्यांची वृध्द आई कमलबाई भुसारी (80) राहते. घरात दुरुस्तीचे काम सुरू असून वृध्द कमलबाई भुसारी रात्री झोपण्यासाठी बाजूलाच राहणारे त्यांचे लहान पुत्र माणिक बाळकृष्ण भुसारी यांच्या घरी गेल्या.
सकाळी उठून ते घरात गेले तेव्हा घराचा मागील दार उघड दिसला. कमलाबाईने इकडे तिकडे पाहणी केली असता त्यांच्या आलमारीतील सर्व कपडे व समान अस्तव्यस्त फेकल्याचे दिसले. तसेच त्यांच्या सुटकेस मधील त्यांचे सोन्याचे दागिने व 45 हजार रुपये गायब होते. घटनेबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून यवतमाळ येथून आलेले डॉग स्क्वाड .व फिंगरप्रिंट एक्स्पर्ट यांनी घटनास्थळ पंचनामा व तपासणी केली. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहरानी यांचे मार्गदर्शनात वणी पोलीस करीत आहे