वणी टाईम्स न्युज : काकाच्या घरी टी.वी. बघण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी रात्री 12 वाजे पर्यंत परत घरी आली नाही. वडिलांनी भावाच्या घरी जाऊन मुलीबद्दल विचारणा केली असता ती 11 वाजता घराकडे निघून गेल्याचे सांगितले. मुलीच्या शोधात रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी गावभर फिरून ही मुलगी मिळून आली नाही. शेवटी वडिलांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मारेगाव तालुक्यात एका गावात मोलमजुरी करून उदनिर्वाह करणाऱ्या फिर्यादी याची पत्नी 4 वर्षांपूर्वी मरण पावली. फिर्यादी याची 14 वर्ष 8 महिन्याची अल्पवयीन मुलगी सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलगी नेहमी रात्री तिच्या घराजवळच काकाच्या घरी टी.वी. बघण्याकरिता जात होती. 23 तारखेला मुलगी काकाच्या घरी टी वी पाहायला गेली. मुलीची वाट पाहता रात्री 10 वाजता वडीलाना झोप लागली. रात्री 12 वाजता दरम्यान झोपेतून जाग आली असता मुलगी घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी भावाच्या घरी जाऊन विचारणा केली. त्याच्या भावाने सांगितले की, मुलगी टिव्ही पाहून 11 वाजता घराकडे निघून गेली.
गावात मुलीचा शोध घेताना दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता फिर्यादी यांना असे कळले की गावातील शिवा आत्राम (20) हा तरुणसुद्धा घरून बेपत्ता आहे. तेव्हा शिवा यांनी त्यांची अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार फिर्यादी वडिलांनी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 137(2) BNS नुसार गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.