वणी : मारेगाव पोलीस ठाणे हद्दीत एका गावात अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार करुन मातृत्व लादल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीत मुलीने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी नराधम युवकास अटक केली आहे. संजय विलास जुमनाके (22) रा. टाकरखेडा ता. मारेगाव असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी तरुणाने पिडीत 17 वर्षीय मुलीला प्रेमजाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अतिप्रसंग केला. काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात वेदना होत असल्याने कुटुंबीयांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करुन मुलीला 4 महिन्याचा गर्भ असल्याची रिपोर्ट दिली. त्यामुळे कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकली. मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिनं सर्व हकीकत सांगितली.
त्यानंतर पिडीत मुलीच्या आई वडिलांनी मुलीला सोबत घेऊन मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी संजय विलास जुमनाके विरुद्ध कलम 376 (2)(F)(N), 506, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.