जितेंद्र कोठारी, वणी : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनानंतर राज्य सरकारने दबावात येऊन मराठाना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. तसेच मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. शासनाने OBC (VJ, NT, SBC) ची जातनिहाय जनगणना करावी. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. मराठा समाजाला ‘ओबीसी’ मध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये. या प्रमुख मागण्या व इतर 18 मागण्या घेऊन OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वय समिती वणी, मारेगाव व झरी यांच्या वतीने वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 11 फेब्रु. रोजी भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत शनिवार 27 जाने. रोजी OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना विजय बोबडे यांनी सांगितले कि ‘अभी नही तो कभी नही’ ची परिस्थती आज ओबीसी समाजासमोर आहे. येणाऱ्या काळात आमच्या मुलांनी जर आम्हाला विचारले कि शासनाने ओबीसी समाजाचा हक्क तुमच्याकडून हिसकावून घेत असताना तुम्ही काय करीत होते ? तर आम्ही त्यांना काय उत्तर देणार. त्यामुळे समस्त ओबीसी समाजाने ताकदनिशी एकत्र येऊन शासनाला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडणे गरजेचे आहे. यावेळी कृती समिती निमंत्रक मोहनजी हरडे अध्यक्ष प्रदीप बोनगिनवार, समन्वयक पांडुरंग पंडीले व प्रवीण खानझोडे यांनी समितीची भूमिका पत्रकारांसमोर मांडली.
एल्गार मोर्चा बाबत माहिती देतांना आयोजकांनी सांगितले कि 11 फेब्रुवारी रोजी येथील शासकीय मैदान येथून हजारो ओबीसी बांधव जमा होऊन शहरातील विविध भागातून घोषणाबाजी करीत मोर्चा काढणार आहेत. त्यानंतर परत शासकीय मैदानावर मोर्च्याचे रुपांतर सभेत होणार आहे. यावेळी दिल्ली येथील प्रसिद्द वक्ते व ओबीसी विचारवंत प्रा. डॉ. लक्ष्मण यादव हे सभेला संबोधित करणार आहे. सभेनंतर ओबीसी समाजाचे शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी यांना मागण्याचे निवेदन देणार आहे. या एल्गार मोर्च्यात ओबीसी समाजातील सर्व जातसमूहाने एकत्र येऊन आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी सहकुटुंब सहपरिवार, आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्रमंडळीसह सहभागी व्हावे असे आवाहन OBC (VJ, NT SBC) ज्ञातनिहाय जनगणना कृती समितीतर्फे करण्यात आले आहे.