मारेगाव प्रतिनिधी : भरधाव प्रवासी ऑटो पलटी होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी कोलगाव मारेगाव मार्गावर घडली. या अपघातात ऑटो चालकसोबत बसलेला युवक जखमी झाला. भावेश विकास केळकर (34) रा. मारेगाव असे अपघातात मृत ऑटो चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार भावेश केळकर हा सोमवारी सकाळी प्रवासी घेऊन कोलगाव येथे गेला होता. कोलगाव येथून परत मारेगावच्या दिशेने येताना एका वळणावर चालक भावेशचा ऑटोवरून नियंत्रण सुटला आणि ऑटो रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. या अपघातात भावेशला जबर मार आणि ऑटोच्या खाली दबून तो जागीच गतप्राण झाला. तर सोबत बसलेला दिनेश उईके नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला.
मृतक भावेश केळकर यांनी नुकतेच वन विभागाची परीक्षा पास केली असून काही दिवसांनी त्याची वन विभागात नोकरी लागणार होती. तो भूमिअभिलेख विभागातून सेवानिवृत्त विकास केळकर यांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी तसेच आप्त कुटुंब आहे.