जितेंद्र कोठारी, वणी : जगभरातील लोकांना एचआयव्ही (HIV) संसर्गाबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World AIDS Day) साजरा केला जातो. जगात तसेच देशात एड्स रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी लाखो लोकं या आजाराने ग्रसित होऊन मृत्युमुखी पडतात. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये एड्सबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने एड्स दिवस साजरा केल्या जातो. जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदा ऑगस्ट 1988 मध्ये जागतिक एड्स दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने आज आपण या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. तसेच या रोगाचे कारणं, लक्षणं आणि उपायांविषयी माहिती घेणार आहोत.
एड्स रोग म्हणजे काय ?
AIDS चा फूल फॉर्म (अक्वायर्ड इम्यून डिफीसियंसी सिंड्रोम) असा आहे. हा एक संसर्गजन्य लैंगिक रोग आहे. ज्या विषाणूपासून त्याची उत्पत्ती होते त्याला ह्युमन इम्यून डेफिशियन्सी व्हायरस (HIV) म्हणतात. जीवाणूंशी लढण्यासाठी शरीराच्या स्वतःच्या नैसर्गिक शक्तीला रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात. परंतु एड्सचा विषाणू या पांढऱ्या रक्त पेशींना निष्क्रिय करून व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी करतो, ज्यामुळे विषाणूशी लढण्याची शरीराची शक्ती संपते. यामुळे व्यक्ती हा कमकुवत होतो.
एड्स कसा पसरतो ?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, एचआयव्ही हा विषाणूमुळे होणारा संसर्ग आजार आहे. हा आजार असुरक्षित लैंगिक संबंधातून, संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे किंवा गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान आईपासून बाळापर्यंत पसरू शकतो. प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे आणि एचआयव्ही असलेल्या व्यक्तीशी संबंध ठेवल्यामुळे एड्सचे विषाणू शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे आरोग्य तज्ञ लोकांना कंडोम वापरण्याचा सल्ला देतात.
काय आहेत लक्षणे ?
एड्सची पहिली लक्षणे म्हणजे इन्फ्लूएंझा (फ्ल्यू) सारखी लक्षणे किंवा सूजलेल्या ग्रंथी असू शकतात. परंतु काही वेळा लक्षणे दिसू शकत नाहीत. दोन किंवा तीन महिन्यांनंतर लक्षणे दिसू शकतात. घसा खवखवणे, स्नायू दुखणे, पुरळ, तोंड किंवा जननेंद्रियाच्या अल्सर, डोकेदुखी, ताप, मुख्यत: मान वर सूजलेल्या लिम्फ ग्रंथी, सांधे दुखी, अतिसार, रात्री घाम येणे इत्यादी लक्षणे असू शकतात.
काय काळजी घ्यावी ?
एड्स या आजारावर अजूनही कोणतेही प्रभावी औषधोपचार नाही. त्यामुळे हा आजार होऊ नये यासाठी काळजी घ्या. वेश्यागमन तसेच HIV पोजिटिव्ह असलेल्या स्त्रीसोबत लैंगिक संबंध टाळावे. लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करावा. वरील लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टर किंवा जवळचे सरकारी दवाखान्यात जाऊन चाचणी करावी. कोणतीही लाज न बाळगता डॉक्टरांना वस्तुस्थिती सांगून उपचार सुरु करावा.
वणी तालुक्यात एड्स आजाराची परिस्थिती व उपचार
वणी हा औद्योगिक शहर असून बाहेर राज्यातील हजारो कामगार येथे कामानिमित्त वास्तव्यास आहे. लैंगिक संबंधाबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने येथे एड्स रुग्णाची संख्या वाढत आहे. वर्ष 2020-21 मध्ये वणी आरोग्य विभागात 38 रुग्णाची नोंद आहे. तर 2021- 22 मध्ये घट होऊन 29 आणि 2022-23 मध्ये 33 एड्स बाधित रुग्ण उपचार घेत आहे. एड्सग्रसित रुग्णासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र (दिशा) कार्यरत आहे. एड्स आजारासंबंधी माहिती व सल्लासाठी आरोग्य विभागाचे टोलफ्री क्रमांक 1097 वर ही नागरिक संपर्क करू शकतात. वणी ग्रामीण रुग्णालयात एड्स रुग्णांसाठी वैधकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, आयसीटीसी समुपदेशक प्रकाश काळे, संगीता वैद्य तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ कविता मुजगेवार कर्तव्यावर आहे.