वणी : वेकोलि क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या उमरेड येथील वेकोलि कर्मचाऱ्याचा गळ्यावर चाकू लावुन मोबाईल, पर्स व दुचाकीची चावी लुटून नेल्याची घटना दीपक चौपाटी भागात घडली. पिडीत वेकोलि कर्मचाऱ्यांनी याबाबत शनिवार 25 नोव्हे. रोजी रात्री वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. वणी पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून अवघ्या 3 तासात प्रेमनगर वस्तीमधून चार आरोपींना अटक केली.
फिर्यादी शैलेंद्र मोहन सिंग (50) रा. WCL कॉलोनी, उमरेड येथील रहिवासी आहे. ते वेकोलि उमरेड येथे नोकरीवर आहेत. वेकोलितर्फे कुचना (माजरी) येथे आयोजीत क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी ते आपले मित्र उमाकांत पाल सोबत 24 तारखेला माजरी येथे आले होते. 25 तारखेला क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर दोघं दुचाकीने वणी येथे फिरायला आले.
सायंकाळी 6 वाजता दरम्यान दीपक चौपाटी भागात एका बारमध्ये ड्रिंक केल्यावर दोघं बाहेर पडले. दरम्यान फिर्यादी शैलेंद्र मोहन सिंग हे लघुशंका करण्याकरिता मोकळ्या जागेवर गेले. लघुशंका करीत असताना मागून आलेले तिघांनी त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांच्या खिशातून बळजबरीने मोबाईल, पर्स आणि दुचाकीची चावी हिसकावून पळ काढला. त्यांच्या पर्समधील पॅनकार्ड, आधार कार्ड, एटीएम, रोख 3 हजार आणि थायलंड करंसीचे 3 नोटासह एकूण 23 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. घडलेल्या घटनेबाबत पिडीत वेकोलि कर्मचाऱ्यांनी रात्री 9.30 वाजता पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रार मिळताच ठाणेदार अजित जाधव यांनी तत्काळ डीबी पथक कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. डीबी पथकाचे विकास धडसे, सागर सिडाम, भानुदास हेपट यांनी दीपक चौपाटी गाठून मिळालेल्या माहितीवरून प्रेमनगर परिसरातून रात्री 12.35 वाजता आरोपी शेख इरफान शेख सलीम (24), शेख शाहरुख शेख सलीम (23), विजय भारत गेडाम व ईतर एक सर्व रा. खरबडा मोहल्ला वणी या आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध कलम 392, 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.