वणी: शहरातील अल्पवयीन व लहान मुलांना नशेचे व्यसन जडल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. नशेचे आहारी गेलेले बहुतांशी मुले गरीब व मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहे. आईवडील कामावर गेल्यावर हे मुल शहर व शहरालगत निर्जन स्थळी जमा होऊन गांजा, सोल्युशन, व्हाईटनरचा नशा करीत असल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी वणी नगर परिषदेच्या एका सजग कर्मचाऱ्यांनी निर्गुडा नदी काठावरील वसंत गंगा विहार परिसरातून अंदाजे 12 वर्षाच्या एका लहान मुलाला सोलुशनचा नशा करताना रंगे हात पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्या मुलाने पोलिसांना जे सांगितले ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली.
शहरातील सेवानगर, रंगारीपुरा, शास्त्रीनगर व खरबडा भागातील अवघ्या 10 ते 17 वर्ष वयोगटातील 15 ते 20 मुलांचा एक गट असल्याची माहिती त्या मुलानी पोलिसांनी दिली. हे मुले बूट चपला दुरुस्ती करणाऱ्या मोचीच्या दुकानातून सोलूशन विकत घेतात. सोलूशन विकत घेण्यासाठी हे मुले एकाद्या वयस्कर व्यक्तीला पैसे देऊन दुकानात पाठवतात. सोलूशन आणून देण्याच्या मोबदल्यात त्या व्यक्तीला दारू पिण्यासाठी काही पैसे देतात. 80 रुपयात 100 मिली सोलुशन विकत घेऊन हे शहरातील व शहरालगत निर्जन स्थळी एकत्र होतात. सोलूशनचा नशा करण्यासाठी प्लास्टिकच्या एका पिशवीत सोलुशन टाकून नाकाद्वारे हुंगून नशा करीत असल्याचे प्रात्यक्षिक मुलानी पोलिसांसमोर करून दाखविले.
नशेत या मुलांकडून मुलींची छेड काढणे, एकट्यादुकट्या लहान मुलांना अकारण बेदम मारहाण करणे, आरडओरड करीत धिंगाणा घालणे, विक्षिप्त-अश्लील हावभाव-टिप्पणी करणे असे प्रकार घडत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहेत. हीच मुले इतर मुलांना नशेबाजीकडे ओढून त्यांचेही जीवन बर्बाद करीत आहेत. अशा प्रकारे लहान मुले नशेच्या आहारी गेल्याने पालकांसमोर धोक्याची घंटा तर पोलीस प्रशासनासमोर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुलाच्या माहितीवरून पोलिसांनी आंबेडकर चौक परिसरातील बूट चपला दुरुस्ती करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे. तसेच त्यांच्या जवळ असलेले सोलूशनचे डब्बे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.
निर्जन ठिकाण नशेबाजांचे अड्डे
शहरातील निर्जन ठिकाणे अशा नशेबाजांचे अड्डे ठरत आहेत. यामध्ये सरकारी दवाखानाच्या मागे असलेले निर्जन स्थळ, शास्त्री नगर, मोक्षधाम परिसर, बरड टेकडी, शहरालगत असलेले निर्जन ले ऑउट यासारखी अनेक ठिकाण शोधून हे मुले नशा करण्यासाठी त्याचा वापर करतात. मुलांमध्ये धुम्रपान, मद्यपाना बरोबरच अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे. इतर नशेच्या तुलनेत स्वस्तात उपलब्ध होणारे विशिष्ट अंमली पदार्थ शहरात सहज मिळत असल्याने त्याकडे अल्पवयीन मुले देखील ओढली जात आहेत. या या सर्व प्रकाराची परिणीती एखादी मोठी अनुचित घटना घडण्याची भीती जागरूक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
—