सुशील ओझा, मुकुटबन : पारधी समाजातील महिलासह तिघांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची तक्रारीवरून झरीजामणी तालुक्यातील डोंगरगाव येथील चौघांवर मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम (अट्राॅसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज अनिल नांदेकार, आशिष रमेश जिवतोडे, अनिल नांदेकार व अनिकेत गणेश जीवतोडे सर्व रा. डोंगरगाव, ता.झरीजामणी असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी अंकुश बापूजी पवार, रा. डोंगरगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डोंगरगाव येथे तलाव खोलीकरणचे काम सुरु असून गावकऱ्यांना तलावाची गाळ मोफत नेण्याची सुट देण्यात आली आहे. फिर्यादी यांनी आपल्या शेतात गाळ टाकण्यासाठी रुपापेठ (खडकी) येथून 3 ट्रॅक्टर बोलाविले होते. दिनांक 27 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता फिर्यादी अंकुश पवार यांचे ट्रॅक्टर तलावात माती भरण्याकरिता गेले असता गैर अर्जदार पंकज अनिल नांदेकार यांनी आपला ट्रॅक्टर मधात टाकून नंबरवरुन फिर्यादी सोबत वाद केला.
वाद सोडविण्यासाठी फिर्यादीची पत्नी पूजा अंकुश पवार व लहान भाऊ लहू बापूजी पवार मध्ये आले असता आरोपी पंकज नांदेकार यांनी त्या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नी व भावाला मारहाण होत असताना सोडविण्यास गेला असता आरोपी आशिष रमेश जिवतोडे, अनिल नांदेकार व अनिकेत गणेश जीवतोडे यांनी अंकुश पवार याला काठीने डोक्यावर व हातावर मारुन जखमी केले. मारहाणीत बेशुध्द झाल्यामुळे फिर्यदीला उपचाराकरिता वणी व नंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.
आरोपीने अश्लील शिवीगाळ व मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तसेच झटापटीत त्याची पत्नीच्या गळ्यातील पोत कुठेतरी पडल्याची तक्रार फिर्यादी अंकुश बापूजी पवार यांनी नोंदविली. तक्रारदार हा पारधी समाजाचा असून पोलिसांनी सर्व आरोपीविरुध्द कलम 326, 34, 504, 506 भादवि तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 चे कलम 3(1)(R), 3(2), 3(V), 3(2)(VA) आणि 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे करीत आहे.