वणी टाईम्स न्युज : वणी शहरातील सुप्रसिध्द मंडप डेकोरेशन व्यावसायिक स्व. अरुणराव गणपतराव बिलोरिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या पत्नी सुनीता अरुण बिलोरिया, सुपुत्र शाश्वत अरुण बिलोरिया व सुपुत्री वैष्णवी अरुण बिलोरिया यांच्या तर्फे वणी येथील ऐतिहासिक जैताई माता मंदिराला सागवान लाकूडचे भव्य दार भेट देण्यात आले.
बुधवारी सकाळी मंदिरात पारंपरिक पूजा-अर्चा करून या दाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आला होता. मंदिर समिती व भाविकांनी बिलोरिया परिवाराच्या या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
स्व. अरुणराव बिलोरिया हे समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या स्मरणार्थ दिलेली ही भेट मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारी तसेच भाविकांसाठी हे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. या प्रसंगी बिलोरिया कुटुंबासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, मंदिर समितीचे सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.