जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलीस ठाण्यात शनिवार 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शांतता समतीची बैठक पार पडली. या बैठकीत शांतता कमिटी सदस्य, दक्षता समिती सदस्य, महिला समिती सदस्य, व्यापारी, पत्रकार उपस्थित होते. ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या बदलीनंतर शुक्रवारी नव्याने रुजू झालेले ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी शहराची धार्मिक, सांस्कृतिक व भौगोलिक परिस्थिती तसेच समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते.
सभेत उपस्थित नागरिकांनी शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक, बेधुंद दुचाकी वाहने, अवैध व्यवसाय, चोरीच्या वाढत्या घटना तसेच अल्पवयीन मुलांकडून मादक पदार्थाचं सेवन बाबत ठाणेदार उंबरकर यांना माहिती देऊन उपाय योजना करण्याची मागणी केली. श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी वणी शहरात धार्मिक एकोपा असून सर्व धर्माचे नागरिक येथे एकमेकांचे सण उत्सवात सहभागी होत असल्याची माहिती ठाणेदारांसमोर ठेवली. यावेळी ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी शहरात चार ठिकाणी फिक्स पॉइंट बसविण्यात येणार असल्याची माहिती दिली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांचा सहकार्य अपेक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, वाहतूक नियंत्रण शाखा प्रभारी API सीता वाघमारे, API अपसुंदे, PSI सुदाम आसोरे, PSI गुल्हाने, PSI रायबोले तसेच राकेश खुराणा, राजाभाऊ पाथ्रडकर, रवी बेलुरकर, गजानन कासावार, चंद्रकांत फेरवानी, मंगल तेलंग, आबिद हुसैन, राजू तुरणकर, नारायण गोडे, नीलिमा काळे, मंगला झिलपे, सुरेखा वडीचार, वैशाली तायडे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार उपस्थित होते.