वणी टाईम्स न्युज : “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ व “देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचे प्रत्यय येथील झामड कुटुंबीयांना शुक्रवारी पहाटे झालेल्या कार अपघाताच्या प्रसंगी आला असावा. भरधाव कार विजेच्या खांबेला जाऊन धडकली. जिवंत विद्युत तारांसह खांब जमिनीतून उखडून त्यांच्या कारवर पडला. कारचा समोरील भाग व काच चक्काचूर झाला. परंतु सुदैवाने कार चालक आशिष झामड व बाजूच्या सीटवर बसलेली त्यांची अर्धांगिनी अभिलाषा यांना खरोचही लागली नाही.
येथील मणीप्रभाश्री टॉवर मध्ये वास्तव्यास व्यावसायिक आशिष झामड (44) व त्यांची पत्नी अभिलाषा हे कारने त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे स्टेशन सोडण्यासाठी गुरुवारी रात्री बल्लारशाह येथे गेले होते. नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसवून रात्री 2.30 वाजता दरम्यान पती पत्नी परत वणीसाठी निघाले. त्यावेळी आशिष झामड हे कार चालवत होते. रात्रीच्या वेळ असल्याने आशिष हा सावकाश कार चालवत होता.
अंदाजे पहाटे 4 वाजता दरम्यान नांदेपेरा मार्गावरील जि. प. शाळा क्रमांक 5 समोर कार पोहचली असता चालक आशिष झामड याला डुलकी लागली, आणि सेकंदात होत्याचे नव्हते झाले. एकाद्या सिनेमाच्या सीन सारखी त्यांची कार रस्त्याच्या विपरीत साइडला असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानासमोर एका विजेच्या खांब्यावर जाऊन धडकली.
ही धडक एवढी प्रचंड होती की, विजेचा खांब जमिनीतून उखडून कारच्या बोनटवर पडला. या अपघातात सुझुकी सियाज कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला तर खांब कारच्या काचेवर पडल्यामुळे डाव्या साइडने काच चक्काचूर झाला. त्याच बाजूला आशिषची पत्नी अभिलाषा बसून होती. परंतु खंब्याला धडक बसताच चालक व सहयात्रीच्या समोरील दोन्ही एअर बॅग क्षणातच उघडली गेली. तसेच करंट सुरु असलेले विजेचे तार हवेतच लोमकळत राहिले. त्यामुळे कारमधील झामड दाम्पत्य थोडक्यात बचावले. झामड दांपत्यासोबत घडलेला प्रसंग पाहता त्यांच्यासाठी ‘ देव तारी त्याला कोण मारी ‘ असेच म्हणावे लागेल.