वणी टाईम्स न्युज: शहरालगत चिखलगाव येथील रामदेवबाबा सत्संग मंडळाचे कार्याध्यक्ष दलितमित्र मेघराज भंडारी (बापजी) यांचा 85 वा जन्मदिन रामदेवबाबा मूकबधिर विद्यालयात वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मेघराज भंडारी यांची धर्मपत्नी कांताबाई भंडारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक हरिहर भागवत, अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार, आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सुधाकर गारघाटे, सचिव जयप्रकाश राजुरकर, सेवानिवृत नायब तहसीलदार दिगंबर गोहकार, वसंतराव उपरे, सेवानिवृत केंद्र प्रमुख लक्ष्मण इद्दे, अंबर घरोटे, विजय गंधेवार, डॉ. जितेंद्र भंडारी, प्रवीण सातपुते प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी मूक बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सांकेतिक भाषेत भंडारी यांनी त्यांच्यासाठी ही शाळा सुरू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी तयार केलेले शुभेच्छा कार्ड दिले. त्यानंतर हरिहर भागवत, गजानन कासावार, लक्ष्मण इड्डे यांनी मेघराज भंडारी यांनी सुरू केलेल्या सेवा प्रकल्पाविषयी कौतुक करून भविष्यात ही सर्व कामे अशीच सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर विजय गंधेवार यांनी मूल्य शिक्षणावर विद्यार्थ्यांना उद्बोधन केले.
वाढदिवस व वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मूक बधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरोज भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन चित्रा लारोकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रिया मिलमिले यांनी केले. या प्रसंगी अविनाश क्षीरसागर, आनंद ताजने, अमोल गोहणे प्रामुख्याने उपस्थित होते.