वणी टाईम्स न्युज : यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे वणी पोलीस ठाण्याचे प्रभार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांना देण्यात आले आहे. अवैध धंद्याचा गड तसेच क्रीम पोलीस स्टेशन म्हणून वणीची सर्वदूर ओळख आहे. परिसरात रेती तस्करी, कोळसा चोरी, भंगार चोरी, अवैध दारुविक्री व वाहतूक, मटका, जुगार, गांजा विक्री, गुटखा व इतर अवैध धंदे पोलिसांच्या नजरेखाली सुरु आहेत. या अवैध धंद्यांवर प्रभारी ठाणेदार पो. नि. गोपाल उंबरकर अंकुश लावणार, की जसं आहे तसं सुरु ठेवणार ? किंवा यापैकी कोणते धोरण अवलंबितात याकडे वणीकर नागरीकांचे लक्ष लागले आहे.
वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या एका वर्षाच्या काळात अवैध धंद्यांना उत आला होता. शिवाय दरोडा, घरफोड्या, खून, दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. पोलीस आणि सर्व साधारण जनता यामध्ये दुवाचे काम करणारे स्थानिक पत्रकारांशी अनिल बेहरानी यांनी कायम दुरावा ठेवला. नुकतेच उघडकीस आलेले गोवंश कत्तल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कठोर कारवाई न करता साधी कलमा लावण्यात आली. त्यामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपींची काही तासातच न्यायालयाकडून जामिनावर सुटका झाली.
उंबरकर साहेब… शहरातून अवैध धंद्याचे समूल उच्चाटन होईल, अशी अपेक्षा वणीकरांनी अजिबात ठेवता कामा नये .! मात्र शहरातील अल्पवयीन व तरुण युवकांचा भवितव्य अंधारमय करणारे मटका, जुगार, गुटखा, गांजा, ड्रग्स विक्रीवर अंकुश लावण्याचे तसेच राजमातेचा दर्जा प्राप्त गो मातेचा जीव वाचविण्याचा काम तुम्ही प्रामाणिकपणे कराल, अशी अपेक्षा आपल्याकडून ठेवणे काही गैर ठरणार नाही.